ग्रामीण नेतृत्व शहरावर लादत असल्याचा आरोप

Foto
शहर भाजपात नाराजीनाट्य
भाजप प्रदेश  कार्यकारिणीच्या निवडीवरून आता शहर भाजपात नाराजी नाट्य सुरू झाले आहे. महत्वाची पदे खासदार दानवे यांच्या समर्थकांना बहाल केली जातात आणि शहर भाजपा कडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नाराजांनी केली आहे.
 भाजप प्रदेश कार्यकारिणीची घोषणा काल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. त्यात चिटणीस पदी इद्रिस मुलतानी यांना स्थान देण्यात आले आहे. तर जालन्याचे मनोज पांगारकर, सुरेश बनकर यांनाही प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. ही तीनही नेते जालना मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. शहरातील डॉ. भागवत कराड, हाजी मोहम्मद एजाज देशमुख, राजू शिंदे आणि प्रवीण घुगे यांना प्रदेश कार्यकारणी स्थान मिळाले आहे. इद्रिस मुलतानी यांच्या निवडीवरून भाजपात नाराजी नाट्य सुरू झाले आहे. यापूर्वीही शहर भाजपावर खासदार दानवे यांचा वरचष्मा दिसून आला. जालना मतदारसंघाबरोबरच शहर भाजपावर दानवे समर्थकांची वर्णी लावण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यामुळेच जुन्या- नव्या पदाधिकार्‍यांमध्ये खदखद बाहेर पडत आहे. 
मराठवाड्यातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व असल्याचे शल्य अनेक नेत्यांना खुपते. अशा वेळी शहरातील नेतृत्व बळकट करण्यावर पक्षाने जोर दिला पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे. मात्र रावसाहेबांनी ग्रामीण नेतृत्व शहरावर थोपवण्याचा जणू विडाच उचलला आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून विजय औताडे यांना थेट उपमहापौर करण्यात आले. आता त्यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शहर संघटना वार्‍यावर
दरम्यान, शहर भाजपाला एकाच वेळी एमआयएम आणि शिवसेनेशी सामना करावा लागतो आहे. औरंगाबादेत भाजपच्या वाढीला पोषक वातावरण असताना प्रदेश कार्यकारणीने शहरातील नेतृत्वाला दुर्लक्षित केल्यामुळे भाजपाची नाराजी समोर आली आहे.